व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांना ‘जाणीव फाऊंडेशन संगमनेर २०२६’ पुरस्कार जाहीर

संगमनेर : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करून सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने जाणीव फाऊंडेशन, संगमनेर यांच्या वतीने देण्यात येणारे ‘संगमनेर २०२६ पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. कला विभागातील पुरस्कारासाठी संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक व व्याख्याते अरविंद गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात’ गाडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या सामाजिक व कलात्मक योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्र, लेखन आणि व्याख्यान या माध्यमांतून सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन व्यसनमुक्ती, वृक्षसंवर्धन, मोबाईलचा अतिवापर तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचे काम ते करीत आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये व्यंगचित्रकलेची आवड निर्माण व्हावी आणि कलेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव विकसित व्हावी, यासाठी त्यांनी अनेक शाळांमध्ये चित्रकला व व्यंगचित्रकलेची ओळख करून दिली आहे.
गाडेकर यांनी आतापर्यंत १२,२०० हून अधिक व्यंगचित्रे साकारली असून, या कार्याची दखल घेत त्यांना ‘ग्लोबल बुक्स ऑफ अवॉर्ड’ हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच १० हजार व्यंगचित्रे साकारल्याबद्दल महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या कार्याची नोंद झाली आहे. राज्यातील आघाडीची दैनिके, मासिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांच्या व्यंगचित्रांना प्रसिद्धी मिळाली आहे.
सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या व्यंगचित्रांना विनोदाची जोड असली तरी त्यातून प्रभावी प्रबोधन घडते. ‘व्यंगचित्रातून प्रबोधन’ या संकल्पनेतून व्यसन, मोबाईलचा अतिवापर, पर्यावरण, स्वच्छता, सायबर फसवणूक, आभासी नातेसंबंध, फास्ट फूड आणि आरोग्य अशा विविध सामाजिक विषयांवर ते सातत्याने भाष्य करीत आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, पद्मश्री रघुवीर खेडकर, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, विद्यमान नगराध्यक्ष मैथिली तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अरविंद गाडेकर यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि कलात्मक कार्याची दखल घेत जाणीव फाऊंडेशनने जाहीर केलेल्या या पुरस्काराबद्दल संगमनेर परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!