शिर्डी-नेपाळ यात्रा ठरलेल्या वेळेतच; अफवांवर विश्वास ठेवू नका!
पशुपतीनाथ परिसर सुरक्षित; प्रशासनाचा हिरवा कंदील – विजयराव कोते
शिर्डी । प्रतिनिधी ।
शिर्डीच्या ‘साई निर्माण ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुमारे दीड हजार साईभक्तांच्या १२ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ही ऐतिहासिक यात्रा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. नेपाळमधील परिस्थितीबाबत सोशल मीडियावर फिरत असलेल्या विविध अफवांवर यात्रेकरूंनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन ‘साई निर्माण ग्रुप’चे अध्यक्ष विजयराव कोते यांनी केले आहे.

शिर्डीकर साईभक्तांना १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्याचे स्वप्न ‘साई निर्माण ग्रुप’च्या माध्यमातून साकार होत असून, यात्रेचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाले आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष विजयराव कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा यांच्यासह ग्रुपचे सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
दरम्यान, नेपाळमध्ये आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्याचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे काही यात्रेकरूंमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, व्हायरल होत असलेल्या घटनेचा पशुपतीनाथ परिसराशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेपाळमधील संबंधित सरकार व प्रशासनाशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रशासनाकडून यात्रेसाठी आवश्यक परवानगी आणि सुरक्षिततेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने यात्रा नियोजित वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
“नेपाळमधील पशुपतीनाथ परिसर पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवून साईभक्तांनी घाबरून जाऊ नये. यात्रा ठरलेल्या वेळेत, पूर्ण सुरक्षिततेत आणि आनंदमय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे,” असा विश्वास विजयराव कोते यांनी व्यक्त केला.
यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी साईभक्तांचे स्वागत करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सहकार्याने आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्थेसह ही यात्रा पार पडणार असल्याने यात्रेकरूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अफवांकडे दुर्लक्ष करून यात्रेकरूंनी नियोजित यात्रेसाठी सज्ज राहावे, असे आवाहन ‘साई निर्माण ग्रुप’च्या वतीने करण्यात आले आहे.
