संगमनेर नगरपालिकेतर्फे नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार १ ते २५ सप्टेंबरदरम्यान उपक्रम; नागरिकांच्या प्रश्नांसाठी हक्काचे व्यासपीठ

संगमनेर, दि. २९ ऑगस्ट २०२६ : नागरिकांना आपल्या परिसरातील प्रश्न आणि अडचणी थेट मांडता याव्यात आणि त्यावर वेळेत कार्यवाही करता यावी, यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने १ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रभाग समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून, प्रत्येक प्रभागातील नागरिकांसाठी आपल्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपालिका गटनेत्या दीपाली पंचांरिया यांनी दिली.

या बैठका म्हणजे कोणताही ‘जनता दरबार’ नसून, नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रश्न मांडावेत, त्यावर संबंधित अधिकारी व नगरसेवकांशी थेट चर्चा व्हावी आणि पुढील कार्यवाही निश्चित व्हावी, यासाठीचे व्यासपीठ आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या केवळ सांगून न थांबता त्या समस्यांची माहिती, आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रे किंवा प्रश्नांची यादी घेऊन बैठकीला यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न नागरिकांना या बैठकीत मांडता येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची नोंद केली जाणार असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या बैठकींमध्ये संबंधित प्रभागातील नगरसेवकांसोबत नगरपालिका अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट जबाबदार यंत्रणेसमोर मांडता येतील. प्रश्न समजून घेणे, त्याची नोंद करणे आणि त्यावर प्रत्यक्ष काम सुरू करणे, या पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याचा हा उपक्रम आहे. नगरपालिका कार्यालयात नागरिकांनी येण्याची वाट पाहण्यापेक्षा अधिकारी आणि नगरसेवकांनी नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

१ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या या प्रभागनिहाय बैठकींमध्ये सर्व प्रभागांतील नागरिकांनी आपल्या परिसरातील प्रश्नांची माहिती घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करण्यासाठी अधिकारी आणि नगरसेवक या काळात नागरिकांच्या दारी असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!