सोमवारी नगर परिषदेच्या वतीने विविध विकास कामांचे लोकार्पण
संगमनेर शहरात सीसीटीव्हीची नजर वाढणार
संगमनेर ( प्रतिनिधी)—संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संगमनेर शहरांमध्ये विविध ठिकाणी सीसीटीव्हीचे शुभारंभ तसेच फूड कोर्ट चे उद्घाटन समारंभ काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ सौ मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या वतीने होत असलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर वैभवशाली शहर ठरले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहरातील नागरिक व महिलांची सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही विविध ठिकाणी बसवण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी फूड कोर्ट खाऊ गल्ली निर्माण करण्यात आली आहे याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णपणे पुतळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक, संविधान स्मारक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक याबाबतची माहिती सुद्धा नागरिकांना दिली जाणार आहे.
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता त्रिमूर्ती चौक, जनता नगर कॉर्नर, संगमनेर बस स्थानक कॉर्नर ,चावडी, तीन बत्ती चौक, चंद्रशेखर चौक व नगरपालिका कोर्ट इमारत या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच सह्याद्री कॉलेज जवळ नेहरू गार्डन येथे फूड कोर्ट शुभारंभ करण्यात येणार आहे.
यानंतर 5.30 वाजता संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे यावेळी आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, सर्व माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे निखिल पापडेजा ,सौ प्रमिला अभंग, व विविध पक्षाचे व सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे.
तरी या उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व परिसरातील नागरिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व विभागांचे सभापती, सर्व नगरसेवक नगरसेविका, व मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे यांनी केले आहे
