तळेगाव- वडगाव पान गटात महिला उमेदवारांच्या रिंगणात रंगणार जिल्हा परिषदेची निवडणूक लढत!
संगमनेर (प्रतिनिधी) — जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ झाली आहे. अनेक गट ‘महिला राखीव’ झाल्याने, इच्छुक पुरुष नेत्यांची मोठी पंचाईत झाली असून आता या नेत्यांनी आपापल्या “होम मिनिस्टर” म्हणजेच पत्नींना रिंगणात उतरविण्याची रणनीती आखली आहे.
’साडेतीन वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. सण, उत्सव, कार्यक्रम अशा प्रत्येक निमित्ताने जनसंपर्कात राहणारे हे नेते अचानक आरक्षण सोडतीनंतर निराश झाले. मात्र, या परिस्थितीला सावरत त्यांनी “मी नाही, तर सौभाग्यवती” हे सूत्र पुढे केले आहे. जिल्ह्यातील डझनभराहून अधिक नेत्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
तळेगाव – वडगाव पान हा गट यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्वी वडगाव पान नावाने ओळखला जाणारा हा गट आता तळेगाव नावाने अस्तित्वात आला असून, संगमनेर पंचायत समिती अंतर्गत तळेगाव आणि वडगाव पान हे दोन गण यात समाविष्ट आहेत.
![]()
आ.अमोल खताळ यांच्या आमदारकीनंतर काँग्रेसमध्ये काहीशी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीनेही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या गटात काँग्रेस (महाविकास आघाडी) आणि महायुती यांच्यातील थेट सत्तासंघर्ष रंगणार आहे.
गटात चर्चेत असलेल्या संभाव्य महिला उमेदवार
वडगाव पान येथील युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश थोरात यांच्या सौभाग्यवती वंदना थोरात
जिल्हा नियोजन समिती सदस्य व शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे यांच्या पत्नी आर्चना घोरपडे
शिवसेना (शिंदे गट) कडून माजी पंचायत समिती सदस्या शोभाताई दत्तात्रय काशिद
भाजपचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस माधव थोरात यांच्या पत्नी मंदाकिनी माधव थोरात

📍 राजकीय नेत्यांच्या होम मिनिस्टरांची लढत कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
