प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात विशेष एन.एस.एस. शिबिर उत्साहात संपन्न


लोणी (प्रतिनिधी):
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS), लोणी अंतर्गत कार्यरत प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, लोणी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत दिनांक १६ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष एन.एस.एस. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, यामध्ये ५० एन.एस.एस. स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या शिबिरासाठी डॉ. सूरज बांगर, डॉ. प्रवीण टकले, डॉ. प्रदीप तिडके, डॉ. अक्षय तुपे, डॉ. गार्गी वैद्य, डॉ. स्वाती विखे, डॉ. प्रतिक्षा वाबळे व डॉ. निलेश साळवे यांनी स्टुडंट को-ऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी पार पाडली. संपूर्ण शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी एन.एस.एस. प्रोग्राम ऑफिसर डॉ. निलेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे करण्यात आली.

 

उद्घाटन व मार्गदर्शन
शिबिराच्या पहिल्या दिवशी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास डॉ. भालसिंग, डॉ. चांदूरकर (उपप्राचार्य, प्रवरा ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय) तसेच डॉ. सुनील बुलार (एन.एस.एस. प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, PIMS) यांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांना सामाजिक बांधिलकी व आरोग्यजागृतीबाबत मार्गदर्शन केले.
व्यसनमुक्ती ते आपत्कालीन सेवा जनजागृती
पहिल्या दिवशी तंबाखू व मद्यव्यसनमुक्ती या विषयावर डॉ. भालसिंग यांनी प्रभावी व्याख्यान दिले. त्यानंतर स्वयंसेवकांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्यसनमुक्ती रॅली काढली.
दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांसाठी योग प्रात्यक्षिके, सद्वृत्त पालन, स्वस्थवृत्त व स्वच्छता सवयी यावर आधारित प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी डॉ. सूरज बांगर यांनी सद्वृत्त विषयावर मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी डॉ. अक्षय तुपे यांनी सी.पी.आर. (CPR) चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले. तसेच श्री. संदीप खिरे यांनी बिबट्या चावा, सर्पदंश प्रतिबंध व प्राथमिक उपचारांबाबत माहिती दिली. या उपक्रमाचा ३५० हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेतला.
सर्व रोग निदान शिबिर व वृक्षारोपण

चौथ्या दिवशी प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयातील आयुर्वेद तज्ज्ञांच्या उपस्थितीत ‘सर्व रोग निदान शिबिर’ आयोजित करण्यात आले. या शिबिराचा २५० हून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला.
पाचव्या व अंतिम दिवशी ग्रामपंचायत परिसरात २७ आयुर्वेदिक रोपांची लागवड करण्यात आली. तसेच दैनंदिन वापरातील २५ आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची माहिती व प्रात्यक्षिके ग्रामस्थांना देण्यात आली.
आभार प्रदर्शन
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य उपसरपंच हभप.राहुल महाराज पोकळे यांचे लाभले तर सरपंच सौ. ताराबाई सोनवणे, सदस्य श्री. अण्णासाहेब सोमवंशी, तसेच प्रशासकीय सहकार्याबद्दल ग्रामसेवक श्री. सचिन देवकर यांचे आभार मानण्यात आले.
तसेच मुख्याध्यापक श्री. उत्तम वरपे सर (संत गाडगेमहाराज अवजीनाथ महाविद्यालय, लोहारे) व मुख्याध्यापक श्री. जगदाने सर (प्राथमिक जिल्हा परिषद शाळा, लोहारे) तसेच ग्रामस्थ श्री. सुदर्शन पोकळे, श्री. माधव जाधव, उदमले गुरुजी, श्री. दीपक कदम, श्री. गोकुळ पोकळे, श्री. बाबासाहेब घुले व श्री. वाल्मिक पोकळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
सर्वांच्या सहकार्यामुळे सामाजिक आरोग्यजागृती, व्यसनमुक्ती, आपत्कालीन सेवा प्रशिक्षण व आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रसार करणारे हे विशेष एन.एस.एस. शिबिर अत्यंत यशस्वी ठरले, अशी भावना प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व एन.एस.एस. विभागातर्फे व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!