वडगाव पान परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


वडगाव पान (प्रतिनिधी) —
वडगाव पान व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत चालला असून, लहान मुले, वृद्ध व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत गावातील तसेच परगावातील सुमारे २० ते ३० नागरिक व लहान बालकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

शिर्डी येथून सोडलेली कुत्री कारणीभूत?

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शिर्डी परिसरातून सोडलेली मोकाट कुत्री वडगाव पान व आजूबाजूच्या भागात आल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा थेट फटका गावातील वयोवृद्ध, लहान बालके तसेच प्रवासी नागरिकांना बसत आहे. एकीकडे राज्यात बिबट्याची दहशत असताना, वडगाव पानमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.

तातडीच्या उपाययोजनांची मागणी

या गंभीर परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.

 


“मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉग कॅचर पथकास पाचारण करण्यात आले असून, मोकाट कुत्र्यांना पकडून पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल.”
— संजय कहांडळ, ग्रामपंचायत अधिकारी

“लवकरच पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकरण (नसबंदी) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच शिर्डी येथून सोडल्या जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती खबरदारी व जबाबदारी स्वीकारून तात्काळ पावले उचलावीत. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन सर्वस्वी जबाबदार राहील.”
— सोमनाथ गायकवाड, उपसरपंच, ग्रामपंचायत वडगाव पान

ग्रामस्थांनी प्रशासनाने त्वरित ठोस व प्रभावी कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!