१५ वित्त आयोगातील पाईपलाईन कामात घोटाळ्याचा आरोप; कसारे ग्रामस्थ संतप्त
कसारे (प्रतिनिधी):
कसारे गावात १५ व्या वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेले पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच व माजी उपसरपंच यांनी केला आहे. अवघ्या दीड फुट खोलीवर पाईपलाईन टाकण्यात आल्याने भविष्यात पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित अभियंत्यांना संपर्क साधला असता त्यांनी या कामाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली. तर ग्रामसेवकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असून गावात नियमित ग्रामसभा होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संपूर्ण कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी अहिल्यानगर येथील संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना (सी.ओ.) निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच, माजी उपसरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे.

🗣️ “१५ वित्त आयोगातील पाईपलाईनचे काम म्हणजे केवळ कागदावरच झाले आहे. अवघ्या दीड फुट खोलीवर पाईप टाकले असून हे काम नियमबाह्य आणि धोकादायक आहे.”
🗣️ “संबंधित अभियंत्यांना फोन केला असता त्यांना काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले. मग हे काम कोणाच्या परवानगीने झाले?”
🗣️ “ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देतात, ग्रामसभा घेतल्या जात नाहीत आणि गावात मनमानी कारभार सुरू आहे.”
🗣️ “या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही.”
