ठेकेदारांनी कामे अपूर्ण ठेवल्यास ब्लॅकलिस्ट करा


आमदार अमोल खताळ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश


संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर काही ठेकेदार राजकीय हेतूने तसेच आमदारांना बदनाम करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक विकासकामे अपूर्ण ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कोणत्याही ठेकेदाराने कामे वेळेत पूर्ण केली नाहीत किंवा अपूर्ण ठेवून सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्यास अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे (ब्लॅकलिस्ट) सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

 

काही ठेकेदारांनी स्वतःची मक्तेदारी निर्माण करून एकाच वेळी चार-पाच कामे स्वतःकडे ठेवली होती. मात्र, ही कामे दर्जाहीन झाल्यामुळे वारंवार रस्त्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत चव्हाण यांच्यासह दोन्ही विभागांचे उपअभियंते उपस्थित होते.

दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाकडे जाणारा निळवंडे–जांभुळवाडी फाटा, वडगावपान फाटा–तळेगाव–अकोले रस्ता, शहरातील जीवन विमा महामंडळ (एलआयसी) इमारतीजवळील रस्ता तसेच तालुक्यातील इतर अनेक रस्त्यांवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून वाहनचालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून या सर्व रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र, ठेकेदारांकडून वेळेवर कामे पूर्ण केली जात नाहीत. त्यामुळे अपूर्ण असलेल्या सर्व रस्त्यांची कामे लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

“जे ठेकेदार दर्जेदार काम करत नाहीत, त्यांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात यावा. तसेच ज्या ठेकेदारांच्या रकमा शासनाकडे जमा आहेत, त्या कामांच्या नव्याने निविदा काढून रस्त्यांची कामे लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. ज्या ठिकाणी अडचणी येतील, त्या ठिकाणी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”

— अमोल खताळ (आमदार)
………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!