आपला माणूस, कामाचा माणूस!
आमदार सत्यजीत तांबे यांची औद्योगिक प्रश्नांवर प्रधान सचिवांसोबत सविस्तर चर्चा
संगमनेर : औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. या बैठकीत तालुका व जिल्हास्तरावरील उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांबाबत ठोस मागण्या करण्यात आल्या.
बैठकीत संगमनेर तालुक्यातील साकूर पठार येथे प्रस्तावित MIDC प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय गती देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे आमदार तांबे यांनी नमूद केले.
तसेच राज्यातील १४२ ग्रामीण सहकारी औद्योगिक वसाहतींच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील १५०० एकर इंडियाबुल्सची जमीन उद्योगांसाठी उपलब्ध करून देत मोठ्या गुंतवणुकीला व रोजगारनिर्मितीला चालना देण्याबाबतही चर्चा झाली. त्याचबरोबर येवला (जि. नाशिक) MIDC परिसरात वीज, पाणी व रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठोस मागणी आमदार तांबे यांनी केली.
औद्योगिक विकासाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार आणि परिसराच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी स्पष्ट केली. या बैठकीमुळे औद्योगिक प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

