आ.सत्यजीत दादा तांबे यांची तानाजी सावंत यांच्यासोबत बैठक; संगमनेरच्या आरोग्य प्रश्नांवर तातडीच्या कार्यवाहीची मागणी
संगमनेर ( प्रतिनिधी ) आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत विविध प्रलंबित आरोग्य विषयांवर महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत संगमनेर व परिसरातील आरोग्य सुविधांबाबतच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीदरम्यान महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या त्रुटी व लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अनेक रुग्णांना कागदपत्रांची अडचण, रुग्णालयांच्या समन्वयाचा अभाव आणि मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे आमदार तांबे यांनी नमूद केले. तसेच संगमनेर नगरपरिषद हद्दीतील मंजूर स्वतंत्र महिला रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सिन्नर–वावी ग्रामीण रुग्णालयात मंजूर ट्रॉमा सेंटरचे काम अद्याप सुरू नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. अपघातग्रस्त रुग्णांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी ट्रॉमा सेंटर अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मौजे खांडगाव (ता. संगमनेर) येथे मंजूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कामही लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्यमंत्री सावंत यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.