भैरवनाथनगर ग्रामपंचायतीत ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
श्रीरामपुर – प्रतिनिधी
ग्रामपंचायत भैरवनाथनगर येथे नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि गावकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभरीत्या मिळावा यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ६ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये नवीन रेशनकार्ड, विभक्त रेशनकार्ड, उत्पन्न दाखले, संजय गांधी निराधार योजना, अँग्रीस्टँक योजना, विद्यार्थ्यांसाठी शालेय दाखले तसेच विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना रेशनचे धान्य मिळत नाही अशा नागरिकांनी अन्नसुरक्षा योजनेसाठी अर्ज भरून द्यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली प्रलंबित शासकीय कामे मार्गी लावावीत, असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सौ. दिपालीताई फरगडे, उपसरपंच श्रीमती चंद्रभागा काळे तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना सरपंच सौ. दिपालीताई फरगडे म्हणाल्या की, “ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नागरिकांची कामे गावातच आणि कमी वेळेत व्हावीत या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्रामस्थांना विविध दाखले, रेशनकार्ड तसेच शासनाच्या योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळणार आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.”
