संगमनेर, दि.२९ प्रतिनिधी

जेष्‍ठ तमाशा कलावंत स्‍व. कांताबाई सातारकर यांच्‍या नावाने देण्‍यात येणारा पहीला पुरस्‍कार वाई येथील जेष्‍ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्‍मण आवळे मास्‍तर यांना जाहिर झाला असून, २ नोव्‍हेंबर रोजी पुरस्‍काराचे वितरण होणार असल्‍याची माहीती आ.अमोल खताळ यांनी दिली.

या संदर्भात माहीती देताना आ.खताळ म्‍हणाले की, संगमनेरचे भूमिपुत्र असलेले कवी अनंत फंदी,पहील्या महिला तमाशा कलावंत स्व.पवळा भालेराव,स्‍व.गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, तमाशा कलावंत स्‍व.कांताबाई सातारकर यांच्‍या नावाने दरवर्षी राज्‍यातील कलावंताना पुरस्‍कार देवून सन्‍मानित करण्‍याचा निर्णय आपण आषाढी एकादशीच्या निमिताने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जाहीर केला होता. यातील पहिला पुरस्‍कार स्‍व. कांताबाई सातारकर यांच्‍या नावाने देण्‍यात येणार असून, यंदाच्‍या वर्षीचा पहिला पुरस्‍कार तमाशा कलेमध्‍ये आपले अनमोल असे योगदान देणारे सातारा जिल्ह्यातील वाई येथील श्री.कोंडीराम लक्ष्‍मण आवळे यांना देण्‍याचा निर्णय पुरस्‍कार निवड समितीने घेतला असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातील कला विभागाचे प्रमुख व गायक प्रा.गणेश चंदनशिवे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तयार करण्‍यात आलेल्‍या पुरस्‍कार निवड समितीने आवळे मास्तर यांची पुरस्‍कारासाठी निवड केली.

१९७३ पासून त्‍यांनी तमाशा कलेसाठी स्‍वत:ला झोकून दिले. सात वगनाट्य त्‍यांनी शब्‍दबध्‍द केली असून, अतिशय बिकट अशा कौटूंबिक परिस्थितीवर मात करुन, त्‍यांनी पारंपारिक तमाशा कला जिवंत ठेवण्‍यासाठी कष्‍ट घेतले. चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्‍ता महाडीक यांच्‍या बरोबरीने तमाशा कलेमध्‍ये त्‍यांनी दिलेल्‍या योगदानाचा यथोचित गौरव म्‍हणून आवळे मास्‍तर यांना तालुक्याच्या वतीने सन्‍मानित करण्‍याचा निर्णय यावर्षी घेण्‍यात आल्‍याचे त्यांनी सांगितले.

दिनांक २ नोव्‍हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. राज्‍याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री ना.उदय सामंत यांच्‍या उपस्थितीत तसेच जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली या पुरस्‍कार वितरण सोहळ्याचे आयोजन मालपाणी लॉन्‍समध्‍ये करण्‍यात आले असून, जिल्‍ह्यातील तसेच राज्‍यातील तमाशा कलेतील असंख्‍य मान्यवर कलाकार या निमित्‍ताने उपस्थित राहणार आहेत. या पुरस्‍कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्‍याचे आवाहन आ.अमोल खताळ यांच्‍यासह पुरस्‍कार वितरण समारंभ समितीचे सदस्य जेष्ठ नाट्य लेखक दिग्दर्शक डाॅ.सोमनाथ मुटकुळे,पत्रकार सौ.स्मिता विनय गुणे,आण्णासाहेब काळे, निलिमा घाटगे, सुशांत पावसे, राहूल सोमवंशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!