त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव उत्साहात साजरा
जोर्वे (प्रतिनिधी):
जोर्वे येथील आंबेडकर नगर परिसरात महिला मंडळ समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव भक्तिभाव व उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिव–शाहू–फुले–आंबेडकर व संविधानप्रेमी, पुरोगामी प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे प्रभावी प्रवचन झाले.
तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांना अभिवादन केले. त्यांनी रमाई जयंतीनिमित्त सर्व आंबेडकरी अनुयायांना शुभेच्छा देत समाजप्रबोधनाच्या कार्यात एकत्रितपणे पुढे जाण्याचे आवाहन केले.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी सुश्राव्य वाणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर आधारित ओव्या सादर केल्या. माता रमाई यांनी आयुष्यात भोगलेल्या दुःख, संघर्ष व त्यागाचे जिवंत चित्रण या ओव्यांतून उभे राहिले. या भावस्पर्शी सादरीकरणामुळे अनेक उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते पँथर माणिकराव यादव, जोर्वे गावच्या सरपंच प्रीती दिघे, राष्ट्र सेवा दलाचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले, सह्याद्री विद्यालयाचे माजी प्राचार्य एम. वाय. दिघे सर, माजी उपसरपंच गोकुळ दिघे, ह.भ.प. वामन महाराज, निवेदक रामदास काकड सर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बंटी यादव, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोर वाघमारे, पँथर विनोद गायकवाड, आर.पी.आय. (गवई गट) जिल्हा सरचिटणीस दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष साहेबराव यादव, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गौतम चव्हाण, माजी कृषी अधिकारी विश्वास चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गायक प्रवीण गायकवाड व गायिका प्रियंका गायकवाड यांनी माता रमाई यांच्यावर आधारित भावगीत सादर करून उपस्थितांना भावूक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अलकाबाई चव्हाण, बबईबाई गायकवाड, छायाबाई यादव, सीताबाई यादव, छायाबाई रुपवते, कमल मोकळ, शोभा गायकवाड, सुरेखा यादव आदी महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
हा जयंती उत्सव सामाजिक ऐक्य, समता व संविधान मूल्यांची जाणीव करून देणारा ठरला.

