मालदाड येथे मनरेगा कामात हजेरी मस्टर न काढल्याने आंदोलनाचा इशारा


संगमनेर / प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील मौजे मालदाड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सार्वजनिक वृक्ष लागवड कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामाचे हजेरी मस्टर वेळेत काढले जात नसल्याने कामगारांची मजुरी रखडली असून मजुरांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या संदर्भात ग्रामस्थ व मजुरांच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमनेर यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक मजूर नियमितपणे कामावर हजेरी लावत असूनही अधिकृत हजेरी मस्टर काढण्यात येत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत वारंवार तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.

मनरेगा योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना वेळेवर रोजगार व मजुरी उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे योजनेच्या उद्दिष्टालाच तडा जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात तात्काळ योग्य कार्यवाही करून हजेरी मस्टर नियमितपणे काढावेत व कामगारांना त्यांचे हक्काचे मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी सरपंच गोरक्षनाथ नवले यांनी  केली आहे अन्यथा मालदाड येथील सर्व मजूर व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासन या प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!