हभप. राहुल महाराज पोकळे चर्चेत
तळेगाव गणात निस्वार्थ उमेदवारासाठी जनतेत उमेद!
संगमनेर (प्रतिनिधी):
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक अशा सर्वांच्याच आशा पुन्हा फुलू लागल्या असून, तळेगाव गटातील स्पर्धा अधिकच चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पातळ्यांवर तळेगाव गट, तळेगाव व वडगाव पान गणात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. पक्षांतर्गत शह-काटशहाची साखळी वाढताना दिसत आहे. इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याची धडपड सुरु केली असून, “कोणाला तिकीट?” हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

दरवेळेस मोठ्या गावांना उमेदवारी आणि छोट्या गावांकडे दुर्लक्ष अशा नाराजीची चर्चा मतदारांमध्ये सुरू असून, “मतदान मात्र सर्वांकडून घेतले जाते” अशी दपक्या आवाजातील टीका उमटताना दिसते.
तळेगाव जिल्हा परिषद गटात सध्या निवडणुकीची धामधूम रंगात असून, अनेकांनी “आपणच उमेदवार” असा दावा करीत मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. गण सर्वसाधारण झाल्याने नव्या चेहऱ्यांना संधीची दारं उघडण्याची शक्यता अधिक आहे.

याच पार्श्वभूमीवर लोहारे येथील वारकरी संप्रदायातील हभप. राहुल महाराज पोकळे यांचे नाव विशेषतः चर्चेत आहे. राजकारणापेक्षा संप्रदाय सेवा व समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या या तरुणाने गावोगावी सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
युवक वर्गाकडून राहुल महाराजांना मोठा पाठिंबा मिळत असून, निस्वार्थ आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराची मागणी मतदारांतून वाढत आहे. ठेकेदार प्रवृत्तीच्या उमेदवारांविरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याने तळेगाव गणातील समीकरणे बदलण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
मतदारांमध्ये एकच प्रश्न —
“यंदाची निवडणूक नवा बदल घेऊन येईल का?”
“जनतेचा कल निस्वार्थ नेतृत्वाकडे झुकतोय का?”
तळेगाव गणातील आगामी काही दिवसांची राजकीय घडामोडीच हे चित्र अधिक स्पष्ट करण्यास मदत करतील.

