भव्य माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात  संपन्न


तळेगाव दिघे (प्रतिनिधी) — तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत गुरुवार (दि. 11 डिसेंबर 2025) रोजी भव्य माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आयुक्त श्री. सुखदेव डेरे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. शाळेतील भौतिक व पूरक सुविधा उभारणी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थी विकास, सामाजिक व भावनिक बांधिलकी, आर्थिक पारदर्शकता तसेच शिष्यवृत्ती व पुरस्कार योजनांच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघ कार्य करणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक गडाख यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सचिन भाऊ दिघे, मधुकर दिघे, संतोष दिघे, बाबासाहेब कांदळकर, भाऊसाहेब दिघे, जगन दिघे व अश्विनी दिघे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. गणेश दिघे यांनी शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावूक केले.

माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी श्री. गणेश दिघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. महेंद्र पाटणी, तर कोषाध्यक्षपदी ह. भ. प. अरुण महाराज दिघे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून हनुमंता पांडुरंग गायकवाड गुरुजी, बाळासाहेब दिघे, संतोष दिघे, बाळासाहेब जोर्वेकर, रवींद्र दिघे, दिलीप दिघे, डॉ. भारत दिघे, शुभांगी शिंदे, आत्माराम जगताप, पूनम ताई जोर्वेकर, सलमान शेख आदींची निवड करण्यात आली. तळेगाव दिघे शाळेचा माजी विद्यार्थी संघ अधिक सक्षम, सक्रिय व गुणवत्ता वृद्धीसाठी कटिबद्ध राहील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात माजी आयुक्त श्री. सुखदेव डेरे यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत नवनिर्मित माजी विद्यार्थी संघास अकरा हजार रुपयांची उदार देणगी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक गडाख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी दिघे, माजी अध्यक्षा पूनम ताई जोर्वेकर, भाऊसाहेब दिघे, आरिफ मणियार, सोमनाथ दिघे, सचिन जेडगुले, ज्ञानेश्वर कदम, पल्लवी दिघे, रोहिणी शेजवळ, अमोल दिघे तसेच शिक्षकवृंद—ज्ञानदेव उकिरडे, संतोष दळे, दीपक क्षीरसागर, योगेश नवले, उषा म्हसे, प्रमोदिनी साळुंखे, उज्वला शिंदे, सविता राहणे, स्मिता गायकवाड—यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास डॉ. भरत दिघे, विकास गुरव, डॉ. संतोष डांगे, नामदेव दिघे, सुनील दिघे, मेजर राजेंद्र गुंजाळ, रमेश दिघे, बाळासाहेब दिघे, तुकाराम दिघे, अतुल कदम, राजेश दिघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष दळे व श्रीमती उज्वला शिंदे यांनी प्रभावी शैलीत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!