कौठेकमळेश्वर परिसरात खडी क्रशरचा मनमानी कारभार; नागरिक त्रस्त – आरोग्य व शिक्षण धोक्यात!
कौठेकमळेश्वर (प्रतिनिधी) –
खडी क्रशर धारकांच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. रात्रीभर सुरू राहणाऱ्या क्रशरमुळे होणारा मोठा आवाज, ध्वनीप्रदूषण व धूर यामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. डंपर डंपिंग करताना होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे नागरिक झोपेतून घाबरून उठत आहेत, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. “क्रशर चालक प्रशासनाचे कोणतेही नियम पाळत नाहीत. यामागे कोणाचा तरी आशीर्वाद आहे का, असा प्रश्न नागरिकांत उपस्थित होत आहे,” अशीही चर्चा सर्रास होताना दिसत आहे.
कौठेकमळेश्वरच्या सरपंच वाल्हुबाई वराडे-धाञक यांनी तीव्र निषेध नोंदवित चेतावणी दिली आहे –
“संध्याकाळी ६ नंतर क्रशर चालवण्यास कोणालाही परवानगी नाही. सर्व क्रशर धारकांना आम्ही वेळोवेळी ‘स्टिक्ट वॉर्निंग’ दिली आहे. तरीही नियमांकडे दुर्लक्ष सुरूच आहे. प्रशासनही वारंवार तक्रारी करूनही कानीकपाळी घेत नाही. यापुढे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन करू.”
तलाठी कार्यालयाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे की, क्रशर चालवण्याची परवानगी फक्त सायं ६ वाजेपर्यंतच आहे. त्यानंतर क्रशर सुरू आढळल्यास कठोर प्रशासनिक कारवाई करण्यात येणार आहे.

क्रशरमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील शेतजमिनींचेही मोठे नुकसान होत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते यादव यांनी सांगितले –
“नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शेती यांचे प्रचंड नुकसान होत आहे. लवकरच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत.”
क्रशरमुळे वाढत जाणारे प्रदूषण, प्रशासनाचे मूक समर्थन आणि नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा – हा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचला असून, प्रशासनाचे पुढील पाऊल काय असेल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

