उर्ध्व प्रवरा निळवंडे-2 प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक 4 आणि टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या एकूण 72.65 कोटी रुपयांच्या कामांचे आज आमदार आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन
कोपरगाव तालुका | प्रतिनिधी
उर्ध्व प्रवरा निळवंडे-2 प्रकल्पांतर्गत तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक 4 चे 36.33 कोटी रुपये आणि टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणाली चे 36.32 कोटी रुपये मिळून एकूण 72.65 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या महत्त्वपूर्ण कामांचे भूमिपूजन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील सिंचनक्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमार्फत तालुक्यातील 4 गावांतील 951 हेक्टर क्षेत्र तर वितरिका क्रमांक 4 मधून 2681 हेक्टर क्षेत्र अशा एकूण 3632 हेक्टर क्षेत्राला जलसिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील 13 गावांची 51 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून शेतकरी व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कामांच्या मंजुरीपासून डिझाईन मूल्यार्पणापर्यंत सतत पाठपुरावा करून हे काम शक्य केल्याबद्दल आमदार आशुतोषदादा काळे यांनी राज्य शासनाचे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे विशेष आभार मानले. संबंधित कामांसाठी आमदार काळे यांनी सीडीओ नाशिकचे अधीक्षक अभियंता सी.एन. माळी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून डिझाईन मूल्यांकन करून घेतले, ज्यामुळे अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे उपअभियंता ए.जी. शेख, कुणालजी चोपडे, कंत्राटदार मे. फलौदी कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंदोरचे प्रोजेक्ट मॅनेजर किशोरजी डुबल, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
