राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शिर्डी, दि. २० : – महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळाच्या माध्यमातून कृषि उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन जलसंपदामंत्री व तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

कृषि उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या या खरेदी केंद्रासाठी ६ नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. सध्या बाजारात सोयाबीनच्या दरातील अस्थिरता पाहता शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा म्हणून शासनाची ही योजना उपयुक्त असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
खरेदी केंद्रात १ हजार २८४ अर्ज प्राप्त झाले असून ५७० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांकडून सोयाबीनची ५ हजार ३२८ प्रती क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांनी दिली.
सोयाबीन खरेदीबाबत शेतकरी मोठ्या प्रमाणात विचारणा करीत आहेत. नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा केंद्रात उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन समितीचे सचिव सुभाष मोटे यांनी केले.

